घुग्घुस, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुसमध्ये आजही केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. त्यामुळे महिलांना गरोदरपणात किंवा प्रसूतीवेळी सिझर ऑपरेशनसाठी २७ किमी दूर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय गाठावे लागते. यासोबतच गंभीर आजारांवर उपचारासाठी देखील नागरिकांना चंद्रपूरच्या दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे घुग्घुसवासीयांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
घुग्घुस शहरात ग्रामीण रुग्णालयासाठी एक सुसज्ज इमारत बांधून तयार आहे, मात्र प्रशासनाकडून तिचे लोकार्पण केले गेलेले नाही. ही इमारत वापरात न आणल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर, ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात ७ ऑगस्ट २०२५ रोजी “आत्मक्लेश” आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन शासकीय दवाखान्याच्या परिसरातील लॉयड्स मेटल्स गेटजवळील जागेवर पार पडणार आहे.
या आंदोलनात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहर काँग्रेस, महिला काँग्रेस तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.





