यवतमाळ : जिल्ह्यात वाढत्या वाळू चोरीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी प्रशासनाला कठोर कार्यवाहीचे स्पष्ट आदेश दिले आहेत. महसूल भवन येथे विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत असताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, सीईओ मंदार पत्की, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
वाळू चोरी गंभीर; MPDA अंतर्गत कारवाईचे संकेत
विभागीय आयुक्तांनी सांगितले की, वाळू चोरी ही गंभीर बाब असून महसूल कर्मचाऱ्यांना धमकी किंवा मारहाणीच्या घटना घडल्यास संबंधितांवर MPDA अंतर्गत कार्यवाही करावी. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन पुढील बैठकीत कारवाईचा स्वतंत्र आढावा सादर करावा.
कार्यालयीन सुधारणा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीवर भर
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेंतर्गत दस्तऐवजांचे वर्गीकरण, आणि ॲग्रीस्टॅक योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी शिबिरे आयोजित करण्याचेही आवाहन करण्यात आले.
पाणीटंचाई आणि गाळमुक्ती कामांवर लक्ष
जिल्ह्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, दुषित पाणी स्त्रोत बंद करावेत, तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत अधिकाधिक लोकसहभागातून कामे करावीत, अशा सूचना सिंघल यांनी दिल्या.
‘शासन आपल्या मोबाईलवर’ उपक्रमाचे कौतुक
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या अभिनव उपक्रमाचे आयुक्तांनी विशेष कौतुक करत, लोकांपर्यंत योजनांची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचवण्याचे निर्देश दिले.
तक्रार निवारण आणि गावस्तरीय भेटीला प्राधान्य
सर्वसामान्यांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यावर भर देत, आठवड्यातून ठराविक वेळ तक्रारींसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी दौऱ्यावर असताना ग्रामस्तरावरील कार्यालयांना भेट देण्याची सूचना देखील त्यांनी केली.
ही बैठक केवळ आढावा नव्हे, तर कार्यक्षम आणि जनहितकारी प्रशासनासाठी दिलेली दिशा होती, असे निरीक्षण अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.




