गडचिरोली – स्वतःच्या शेतात गांजाचे उत्पादन करून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कोरची व मालेवाडा पोलिस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामेश्वर येथील मोहन कोवाची यांच्या घरी पंचासमक्ष झडती घेतली असता, घरात चार पिशव्यांमध्ये एकूण २८.०५ किलोग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची बाजारातील अंदाजित किंमत १ लाख १२ हजार २४० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान मोहन कोवाची याने हा गांजा स्वतःच्या शेतात पिकवल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




