नागपूर | शहरात एकीकडे शासकीय यंत्रणा गरीबांचे घरं आणि रस्त्यावरील हॉकर्सवर कठोर कारवाई करत असताना, दुसरीकडे मात्र दाभा येथील नो डेव्हलपमेंट झोनमध्ये नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे प्रदर्शन केंद्र उभारले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाकरे यांनी आरोप केला की, ही जमीन सार्वजनिक सुविधा व संरक्षण प्रस्थापनासाठी आरक्षित असूनदेखील, कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता काही निवडक खासगी संस्थांच्या फायद्यासाठी नियमांचं सर्रास उल्लंघन करून हे केंद्र उभारलं जात आहे.
“जेव्हा गरीबांचा आश्रय पाडण्यात सरकार आघाडीवर आहे, तेव्हा नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर बांधकामांना मोकळं रान देणं म्हणजे दुहेरी धोरण आहे,” असे ठाकरे यांनी म्हटले.
या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.




