यवतमाळ : श्रीरामनवमीच्या निमित्ताने जय हिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेला हजारोंच्या संख्येने रामभक्तांचा प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड, भाजप नेते मदन येरावार यांनी श्रीराम दरबाराचे विधिवत पूजन केले. पूजनानंतर रामभक्तांनी पारंपरिक पद्धतीने हाताने रामरथ ओढत शोभायात्रेला सुरुवात केली.
शोभायात्रेत भारतीय संस्कृती, लोकपरंपरा, भक्ती आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या ९० हून अधिक झाक्यांचा समावेश होता. प्रत्येक झाकीने एक विशिष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरले ते भूतकोला नृत्य, उज्जैनचे डमरुनृत्य, आणि महाकाली व इतर विविध प्रांतातील पारंपरिक कलापथक. यवतमाळ शहरातील नागरिकांनी विविध ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करत भगव्या पताका आणि फुलांनी वातावरण भक्तिमय केले.
ही शोभायात्रा यवतमाळ शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेचे प्रतीक ठरली, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.




