अमरावती – अलायन्स एअरने मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये ‘डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या नावाची अधिकृत घोषणा न झाल्यामुळे या उल्लेखावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) आक्षेप नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरच्या पत्रामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा समावेश असलेल्या विमानतळाच्या उल्लेखावर एमएडीसीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एमएडीसीच्या वतीने कंपनीला यासंदर्भात ईमेलद्वारे आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
सध्या अमरावतीतील विमानतळासाठी अधिकृत नाव निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोणतेही नाव वापरणे चुकीचे असून, अशा प्रकारचे उल्लेख जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात ‘डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ’ या ऐवजी केवळ ‘अमरावती विमानतळ’ असा उल्लेख व्हायला हवा होता, असेही एमएडीसीने स्पष्ट केले आहे.
विमानतळाच्या अधिकृत नामकरणासाठी लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा असून, तोपर्यंत कुठलेही नाव अधिकृत मानले जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




