नागपूर : ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे.
काल नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींदर सिंगल (IPS) आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पंतप्रधानांच्या नियोजित मार्गाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
पंतप्रधानांचा दौरा – ठिकाणे आणि पाहणी
पंतप्रधान मोदी यांचे आगमन नागपूर विमानतळावर होणार असून, तिथून ते रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट देतील. त्यानंतर ते दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन करतील आणि तिथून थेट माधव नेत्रालयाकडे रवाना होतील.
या संपूर्ण मार्गावर पोलिस आणि महापालिका प्रशासनाने पाहणी करून सुरक्षा तसेच वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.
सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन
दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागपूर पोलिसांकडून शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, मनपाच्या वतीने स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचीही विशेष तयारी करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, नागपूरकर या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.