नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनात आज ‘द केयरींग टच’ संस्थेच्या सहकार्याने एक दिवसीय दंत आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वीपणे पार पडले.
या शिबीराचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्र, बांधकाम विभाग, विद्युत विभाग आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोफत नेत्र व दंत तपासणी करून घेतली. तसेच, तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला आणि मार्गदर्शनही मिळाले.
शिबीरात ‘द केयरींग टच’ संस्थेचे दंत चिकित्सक डॉ. क्षितीजा भक्ते, दंत सहायक सुमीत, नेत्र रोग तज्ञ शोभा यांनी तपासणी केली. तसेच, शिबीराच्या व्यवस्थापनासाठी संस्थेच्या प्रमुख श्रीमती श्वेता आणि एचआर प्रमुख श्रीमती कविता उपस्थित होत्या.
महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, अधिकारी सारीका शेलार, स्मिता शेलार आणि अनेक कर्मचाऱ्यांनी शिबीराचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक होण्याची संधी मिळाली.




