Friday, July 11, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मुल्याधिष्ठित ज्ञान मिळविताना माणूसपणही जपा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती : अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात पारिवारिक जीवन जपल्यामुळे संस्कारशील समाजरचना आजही कायम आहे. नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपापल्या क्षेत्रात मुल्याधिष्ठित ज्ञान मिळवितानाच माणूसपणही जपा. अर्थार्जन करताना उत्तम नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पाळा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

नेमाणी गोडाऊन समोरील सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा समारोपीय सोहळा विद्यालयाच्या स्व.अरविंदजी उर्फ भाऊ लिमये सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सिपना प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगदीश गुप्ता, प्राचार्य संजय खेरडे यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिपना प्रसारक शिक्षण मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. आजवर येथे कितीतरी विद्यार्थी घडले. ज्ञानामुळेच माणसाची किंमत वाढते. शोध, कौशल्य, ज्ञान यांचे रुपांतरण तुमच्या कार्यात केल्यास निश्चितच प्रगती होते. प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखी बाब असते, ती तेवढी शिकून घ्या. आयुष्यात अर्थार्जन करीत असताना ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान यांचे नवनवे प्रयोग करीत रहा. सुरक्षिततेपेक्षा धोके पत्करायला शिका. कोणतेही नवीन कार्य करताना तुमची इच्छाशक्ती खूप महत्त्वपूर्ण आहे. स्वत:ची प्रगती करण्यासाठी वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वपण सिध्द करा.

गडकरी पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी अन्नदाता नसून उर्जादाता आहे. यामुळेच शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. देशाच्या विकासासाठी ‘स्मार्ट व्हिलेज’ या संकल्पनेवर काम करणे सुरु आहे. जीवनमान सुकर करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करा. इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक चारचाकी, दुचाकी वाहने यामुळे सामान्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर अर्थबचत होत आहे. सध्या भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आर्थिक समता आणि सामाजिक समता महत्त्वपूर्ण आहे. ‘नीडबेस रिसर्च’ वर विद्यार्थांनी काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील गरजा गावातच पूर्ण होण्यावर भर द्या. मदर डेअरी, शेणापासून पेंट, इथेनॉलपासून इंधन अशासारख्या छोट्या बदलातून मोठे बदल लवकर होतात. ई-रिक्षा, ई-कार्टमुळे आज मानवी रिक्षा बंद झाली आहे. यासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन नोकरी मागणारे न बनता नोकरी निर्माण करणारे बना, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

सिपना प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गुप्ता यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास आणि प्रगती या विषयी माहिती दिली. संस्थेची वाटचाल अधिक प्रगतीशील करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन विविध उपक्रम राबवावे. पुस्तकी ज्ञानासोबत सामाजिक भान जपा. आयुष्यात सत्कर्म करण्यासाठी संगत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे आपली संगत योग्य राहील यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिपना प्रसारक शिक्षण मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या विकासाबाबतची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय खेरडे यांनी केले. आभार डॉ.विशाल राठी आणि नेहा राठी यांनी मानले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News