नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिका मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून सकाळी ७ वाजता शहरात ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत नागपूरकर मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या निमित्ताने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी आज जय्यत तयारीचा आढावा घेतला. शहरभर विविध ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. तसेच, ऐतिहासिक वारसा आणि शिवाजी महाराजांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नागपूरकरांनी शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
(अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या मनपा कार्यालयात संपर्क साधा.)




