नांदेड : महामार्ग हे विकासाचे ‘गेमचेंजर’ सिद्ध होतात, आणि समृद्धी महामार्गाने हे स्पष्ट केले आहे. सुरुवातीला झालेला विरोध बाजूला सारून समृद्धी महामार्गाने राज्याच्या विकासाला चालना दिली आहे. त्याच धर्तीवर शक्तिपीठ महामार्गालाही हळूहळू लोकांचा पाठिंबा मिळेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नांदेड येथील पवित्र श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांनी गुरुद्वारामध्ये प्रार्थना करत भाविकांशी संवाद साधला. नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील महामार्ग विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
“सुरुवातीला समृद्धी महामार्गाला विरोध होता, मात्र आज तो राज्याच्या प्रगतीला गती देत आहे. त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्गालाही विरोध होत असला, तरी भविष्यात त्याचे फायदे जनतेच्या लक्षात येतील आणि हा विरोध मावळेल,” असे शिंदे म्हणाले.
या दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.




