Saturday, August 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात कडक भूमिका; नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीतून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व सावकारांची आढावा बैठक घेतली. सावकारी कायदा व अधिनियम 2014 मधील तरतुदींचे काटेकोर पालन करूनच सावकारी व्यवसाय करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंह ठाकूर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले की, महाराष्ट्रात सावकारी कायदा अधिनियम–2014 लागू असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सर्व परवानाधारक सावकारांनी नोंदणी करणे बंधनकारक असून शासनाने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा अधिक दर आकारू नयेत. जास्त व्याज आकारणे हा गुन्हा असून त्याबाबत कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी मारहाण, दमदाटी, बळजबरी अथवा कोणतेही अवैध मार्ग अवलंबू नयेत. नियम व कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले की, परवानाधारक सावकारांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करावा. अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारीबाबत माहिती असल्यास ती तात्काळ पोलिस प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान जिल्हा उपनिबंधक जयसिंह ठाकूर यांनी सावकारी कायदा व अधिनियम 2014 संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कलम 5 नुसार सावकारी व्यवसायासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. निबंधकाने मागणी केल्यास कलम 16 नुसार सावकारी व्यवहारांची नोंद तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच अवैध सावकारीतून मालमत्ता खरेदी केली असल्यास कलम 18 नुसार ती रद्द करण्याचे अधिकार निबंधकांना आहेत. राज्य शासनाच्या 16 सप्टेंबर 2014 च्या अधिसूचनेनुसार व्याजदर निश्चित करण्यात आले असून त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

तक्रार नोंदविण्यासाठी:
जिल्हा हेल्पलाईन क्रमांक 18002338691, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, सहाय्यक निबंधक सहकार विभाग, उपनिबंधक सहकार विभाग किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करता येईल. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News