चंद्रपूर : पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या भेटीदरम्यान पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात माओवादीविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व जवानांचा सत्कार करण्यात आला.
मौजा कवंडे, कोपर्शी-फुलनार आणि मोडस्के जंगल परिसरातील चकमकींमध्ये विशेष अभियान पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत अनेक माओवादी कंठस्नान झाले.
27 ऑगस्ट 2025, मौजा कवंडे जंगलात – एका दलम कमांडरसह 4 कट्टर माओवादी ठार.
27 ऑगस्ट 2025, मौजा कोपर्शी-फुलनार जंगलात – एका पीपीसीसह 4 माओवादी ठार.
17 सप्टेंबर 2025, मौजा मोडस्के जंगलात – एका कमांडरसह 2 महिला माओवादी ठार.
या तिन्ही यशस्वी मोहिमेत सहभागी सी-60 चे अधिकारी व जवान यांना पोलीस महासंचालक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याचबरोबर, कवंडे व कोपर्शी-फुलनार मोहिमांचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि मोडस्के मोहिमेचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान, माओवादी हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी सी-60 च्या शौर्यवानांच्या पराक्रमाचे कौतुक करताना उर्वरित माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले.





