चंद्रपूर : राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महसूल विभागातर्फे ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतरस्त्यांचे मॅपिंग, अतिक्रमण हटविणे, पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे, घरकुलाचे सर्वेक्षण आदी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रणेला लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने गंभीरपणे काम करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.
पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक
सेवा पंधरवड्यात पाणंद रस्त्यांचे मॅपिंग आणि क्रमांक देण्याची मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय महामार्गासारखीच शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांना क्रमांक देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. भविष्यात या रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये याचीही दक्षता घेण्यात येईल. शेतीसाठी रस्ता, वीज आणि पाणी महत्त्वाचे असून यामुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे ओढा वाढेल, असे बावनकुळे म्हणाले.
गावात जाऊन करा काम
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहनही मंत्री बावनकुळे यांनी केले. “गावकऱ्यांना असे वाटले पाहिजे की शासन त्यांच्या दारात आले आहे,” असे ते म्हणाले. कोणताही शेतकरी पाणंद रस्त्याविना आणि नागरिक घरकुलाविना राहू नये याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
झोपडपट्ट्यांना नियमितीकरणाचा दिलासा
चंद्रपूर शहरातील 55 झोपडपट्ट्यांना लवकरच कायदेशीर घरे देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. सरकारी जागांवरील घरांचे सर्वेक्षण लवकरच होणार असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
चांदा महसूल मित्र चॅटबोटचे उद्घाटन
महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पोहोचविण्यासाठी ‘चांदा महसूल मित्र चॅटबोट’ (9284061588) तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन महसूल मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
कृत्रिम वाळू प्रकल्पांचा जोर
कृत्रिम वाळू धोरणानुसार शासकीय कामांमध्ये 50% कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात किमान 50 कृत्रिम वाळू प्रकल्प सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
डीबीटीची मोहीम
महसूल विभागाच्या योजनांचा लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 100% घरभेटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महसूल खाते देशात सर्वोत्कृष्ट बनवण्याचा संकल्प
राज्याचे महसूल खाते पुढील पाच वर्षांत देशातील सर्वोत्कृष्ट महसूल खाते बनावे, यासाठी चांगल्या कामांचे सादरीकरण महसूल विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहनही मंत्री बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
संपर्कासाठी ‘चांदा महसूल मित्र’ चॅटबोट – 9284061588 वर संपर्क साधा.
सेवा पंधरवडा – 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025





