देना बँक परिसरातील दुकानावर स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई; १४ लाखांच्या ७०३ शस्त्रांचा साठा उघड
नांदेड : शहरात अवैधरित्या धारदार शस्त्रांची विक्री आणि साठा केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत देना बँक परिसरातील एका दुकानातून तब्बल १४ लाख ४ हजार रुपयांचे ७०३ धारदार शस्त्र जप्त केले आहेत. या कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा शाखेला संबंधित दुकानात मोठ्या प्रमाणावर धारदार शस्त्रांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुकानावर छापा टाकला. या छाप्यात विविध प्रकारची तलवारी, चाकू, गुप्ती आणि अन्य धारदार शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी सर्व शस्त्रे जप्त करत दुकानाची तपासणी केली.
या प्रकरणी दुकान मालक रणजीतसिंग रामसिंग सरदार यांच्याविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शस्त्रसाठा कुठून आणला गेला, त्याची विक्री कोणाला केली जात होती आणि यामागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी ७ मे रोजी देखील नांदेड शहरात मोठी कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी शहरातील विविध भागांतून तब्बल ४ हजारांहून अधिक धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली होती. सलग होत असलेल्या या कारवायांमुळे नांदेडमध्ये अवैध शस्त्रसाठ्याचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाढत्या शस्त्रसाठ्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिस प्रशासनाने अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक गुन्हा शाखेची ही कारवाई नांदेड शहरातील अवैध शस्त्र व्यवहारांवर मोठा आघात मानली जात आहे.




