Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस नगरपरिषद निवडणूक २०२५ : सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५४.५६ टक्के मतदान

प्रणयकुमार बंडी

घुग्घुस/चंद्रपूर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची प्रभागनिहाय व तुलनात्मक आकडेवारी समोर आली असून, शहरातील प्रत्येक प्रभागात मतदानाचा कल वेगवेगळा दिसून आला आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतचे अंतिम आकडे पाहता, काही प्रभागांत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर काही प्रभागांत अपेक्षेपेक्षा कमी मतदान नोंदविले गेले. निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन्ही मतदान अहवाल पत्रांनुसार एकूण मतदारसंख्या ३२,४८८ इतकी होती. यामध्ये पुरुष मतदार : १६,९१७, स्त्री मतदार : १५,५६७ आणि इतर मतदार : ४ अशी नोंद आहे.

सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण १७,७२७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये – पुरुष मतदारांनी केलेले मतदान : ९,३१३, स्त्री मतदारांनी केलेले मतदान : ८,४१४, आणि इतर मतदार : ०, असे एकूण मतदान नोंदविण्यात आले आहे. स्त्री मतदारांचे प्रमाण अनेक प्रभागांत पुरुषांच्या जवळपास पोहोचले आहे. काही प्रभागांत तर स्त्री मतदानाने पुरुषांना मागे टाकल्याचे चित्र दिसून आले, जे सामाजिक दृष्ट्या सकारात्मक संकेत मानले जात आहेत. या एकूण मतदानाची टक्केवारी ५४.५६ टक्के इतकी असून, मागील काही निवडणुकांच्या तुलनेत ही टक्केवारी समाधानकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रभाग १ ते ३ : मध्यम प्रतिसाद

प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मध्ये सकाळी मतदानाचा वेग मंद होता. दुपारनंतर काही प्रमाणात वाढ झाली असली तरी अंतिम टप्प्यात ही वाढ मर्यादितच राहिली. या प्रभागांत ४५ ते ५२ टक्क्यांच्या दरम्यान मतदान नोंदविण्यात आले. पुरुष मतदारांचा सहभाग स्त्री मतदारांपेक्षा किंचित अधिक दिसून आला.

प्रभाग ४ ते ६ : समाधानकारक मतदान

प्रभाग ४, ५ व ६ मध्ये मतदानाची टक्केवारी तुलनेने चांगली राहिली. विशेषतः दुपारी १.३० नंतर मतदारांची गर्दी वाढली. या प्रभागांत ५५ टक्क्यांहून अधिक मतदान नोंदले गेले. महिलांचा सहभाग लक्षणीय असून अनेक केंद्रांवर महिला मतदारांची रांग पाहायला मिळाली.

प्रभाग ७ ते ९ : मतदानात चढ-उतार

या प्रभागांमध्ये सकाळी मतदान समाधानकारक होते; मात्र दुपारच्या सत्रात काही काळ मतदानाचा वेग मंदावला. सायंकाळी पुन्हा वाढ दिसून आली. अंतिम आकडेवारीनुसार येथे ५० ते ५८ टक्के मतदान झाले. पुरुष आणि स्त्री मतदारांमध्ये जवळपास समतोल सहभाग दिसून आला.

प्रभाग १० व ११ : उच्च मतदानाची नोंद

प्रभाग क्रमांक १० आणि ११ मध्ये शहरातील सर्वाधिक मतदान झाले आहे. या प्रभागांत स्थानिक मुद्दे, चुरशीची लढत आणि मतदारांमधील जनजागृती याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. येथे ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान नोंदविण्यात आले असून, काही केंद्रांवर महिला मतदारांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे आकडे सांगतात.

दिवसभरात मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून, पोलीस व निवडणूक प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. महिला मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला, तसेच तरुण मतदारांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

दरम्यान, आज २१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्व उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले असून, मतदारांनी कुणाच्या पारड्यात कौल टाकला आहे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News