नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी शनिवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान शिंदे यांनी पंतप्रधानांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळा संवाद साधला.
एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी पंतप्रधान मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. भेटीदरम्यान केंद्र आणि राज्यातील विविध विकासात्मक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी यांनी या संवादादरम्यान एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) मधील सर्व घटक पक्ष विचारांनी आणि ध्येयांनी जोडले गेले असल्याचे सांगत, ही आघाडी अशीच मजबूत आणि एकसंध राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिंदे यांच्या या भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळातील केंद्र-राज्य सहकार्याच्या दृष्टीने ही चर्चा सकारात्मक ठरणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.




