घुग्घुस, चंद्रपुर — जागतिक पर्यावरण दिन २०२५ च्या पार्श्वभूमीवर “प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व” या विषयावर देशभरात २२ मे ते ५ जून २०२५ दरम्यान जनजागृती मोहीम राबवली जात आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांनी यावर्षीची थीम जाहीर केली आहे – “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन”.
या मोहिमेच्या अनुषंगाने, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC) च्या सूचनेनुसार, घुग्घुस नगर परिषद, जि. चंद्रपूर येथे दिनांक २६ मे २०२५ रोजी एकल वापर प्लास्टिकवर बंदी लागू करत जप्ती कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत अनेक ठिकाणी प्लास्टिक वस्तू जप्त करण्यात आल्या आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
ही महत्त्वपूर्ण कारवाई मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी स्वच्छता निरीक्षक अनिल डांगोरे, शहर समन्वयक लुमिता नागपुरे, तसेच सर्व मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
“कापडी पिशवीचा स्वीकार करा, प्लास्टिकचा बहिष्कार करा!” या घोषवाक्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे.
https://www.facebook.com/share/p/1DW4f4xfLD
नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेऊन प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा.




