नवी दिल्ली – केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज मागविले आहेत. 5 ते 18 वयोगटातील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. इच्छुक उमेदवार 1 एप्रिल 2025 पासून 31 जुलै 2025 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (awards.gov.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात.
हा पुरस्कार शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, तसेच कला व संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. भारतीय नागरिकत्व असलेली आणि भारतात वास्तव्यास असलेली मुले या पुरस्कारासाठी पात्र आहेत. इच्छुक मुले स्वतः अर्ज करू शकतात किंवा इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेद्वारे त्यांचे नामांकन सुचवले जाऊ शकते.
महिला व बालविकास मंत्रालय दरवर्षी या पुरस्कारांचे आयोजन करते आणि देशातील प्रतिभावान मुलांना त्यांच्या अपवादात्मक कार्यगिरीसाठी गौरविते. अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.




