परभणी : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 या वर्षात 12 वी विज्ञान शाखेतील तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती -विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यामधून प्रवेश घेण्यास ईच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी आपला अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट व त्यासोबत आवश्यक सर्व मूळ कागदपत्रासह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, परभणी या कार्यालयाकडे 20 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा जातपडताळणी समितीने केले आहे.
सन 2024-25 मध्ये आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच जाती दावा सिद्ध करणाऱ्या महसुली, शालेय सर्व मूळ कागदपत्र सह समिती कार्यालयात प्रस्ताव सादर करावा. जात वैधता प्रमाणपत्र 3 महिन्यांच्या आत देण्यात येते. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्रा अभावी परभणी जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, परभणी या समितीकडे अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी परभणी समितीचे सदस्य व उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.




